Skip to main content

माझा मॅरेथॉन प्रवास - राहुल जगदाळे


माझा मॅरेथॉन प्रवास🏃

One Run Can Change Your Day,
Many Run's Can Change Your Life

प्रत्येकाला आयुष्यात कोणता ना कोणता छंद असतोच ज्याला तो मनापासून जोपासतो मला पण असंच सहज धावण्याच्या आवडीतून 2015 साली एका छंदाचा नाद लागला आणि सुरू झाली माझ्या आयुष्याची 🏃🏃🏃🏃🏃मॅरेथॉन.....

मॅरेथॉन हा शब्दच मुळात 2015 साली समजला आणि तिथूनच माझा मॅरेथॉन प्रवास सुरु झाला. 


कोणत्याही ध्येयाकडे वाटचाल करताना वरती चढण्यासाठी आपण सुरवातीला ज्या पायरीचा सहारा घेतो त्या पायरीला विसरून चालत नाही कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी चढुच शकलो नसतो. हाच तो माझ्या पायात असलेला 250/- रुपयांचा रबरी बुट ज्याच्या जीवावर मी माझ्या आयुष्यातील पहिली फुल मॅरेथॉन पुर्ण केलेली. अजूनही मी त्याला जपून ठेवलं आहे कारण माझ्या मॅरेथॉन प्रवासाची हिच ती पहिली पायरी आहे आणि विशेष म्हणजे आज जरी या बुटाकडे पाहिले तरी  त्या मॅरेथॉन च्या सर्व आठवणी ताज्या होतात अजूनही स्वतःवर विश्वास बसत नाही की या बुटाने आपण फुल मॅरेथॉन पुर्ण केलेली.

मी त्यावेळी अरुणाचल प्रदेश मध्ये भारताचे अखेरचे गाव कोलोरीयांग येथे तैनात होतो तेव्हा आमच्या गावचा सोशल मीडियावर मलवडी पंचक्रोशी नावाचा एक गृप होता त्याच गृपवर मी एक बातमी वाचली की 6 डिसेंबर 2015 रोजी होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ची ब्रँडअँम्बेसेडर माण ची सुकन्या ललिता बाबर यांना बनवलं आहे

हिच ती बातमी ज्यामुळं प्रेरित होऊन मी पुणे  आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ला रजिस्टर केलेलं

 हे माझ्यासाठी खुप अभिमानास्पद होतं कारण त्यावेळी नुकतेच त्यांनी आशिया खंडात स्टीपलचेसमध्ये भारताच नाव सातासमुद्रापार पोहचवले होतं आणि तेव्हापासून त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर्श मनात निर्माण झालेला. मी कोणताही विचार न करता आपण त्या मॅरेथॉन मध्ये धावायचेच या आत्मविश्वासाने रजिस्ट्रेशन केलं कारण त्यानिमित्ताने तरी ललिता ताईंना भेटता येईल.

   त्याअगोदर मी ट्रेनिंग मधील 15 किमी सोडलं तर 5/10 किमी पेक्षा जास्त केव्हाच धावलो न्हवतो. ड्युटीच्या ठिकाणी हौस म्हणून निसर्गाच्या सानिध्यात रोज 4 ते 5 किमी अंतर चालत पळत पुर्ण करायचो एवढाच काय तो सराव. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मॅरेथॉन साठी जे बुट हवे असतात त्याचा आणि माझा दूरपर्यंत काहीच संबंध न्हवता माझ्याकडे त्यावेळी 2014 मध्ये कलकत्त्याला प्रमोशन च ट्रेनिंग करताना बाहेर रस्त्याच्या कडेला सुट्टे बुट विकायला बसलेलं असतात त्यांच्याकडून घेतलेला 250/- अडीशे रुपयांचा साध्या कुशन चा रबरी बुट होता ज्याच्यात खालून काटा जरी टोचला तरी तो वरती आरपार यायचा आणि ती मॅरेथॉन मी याच बुटावर धावणार होतो कारण त्यावेळी मॅरेथॉन, धावण्यातील कसलच ज्ञान न्हवतं जवळ होता केवळ आत्मविश्वास, जिद्द आणि ललिता बाबर यांची प्रेरणा याच्या जीवावरच ती मॅरेथॉन मी पुर्ण करणार होतो.

आमच्या गावची यात्रा सुद्धा याच महिन्यात असते त्यामुळे पुर्ण एक महिन्याची सुट्टी घेऊन मी गावी आलो. पुणे मॅरेथॉन ला 10 दिवस बाकी होते म्हणजे कोणतीही मॅरेथॉन धावायच्या 8 ते 10 दिवस अगोदर प्रोफेशनल धावक प्रॅक्टिस पुर्ण करून पायांना आराम द्यायला सुरुवात करतात त्यावेळी कुठं नुकतेच माझं प्रॅक्टिस सुरू झालेलं एवढा अज्ञानी होतो मी.

मी पुणे मॅरेथॉन धावणार हे फक्त त्यावेळी नुकतीच ओळख झालेले माझे मित्र सुहास महामुनी आणि मेहुणे सचिन सस्ते यांनाच माहीत होतं. ही मॅरेथॉन धावायचं अजून एक विशेष कारण म्हणजे भारतात मॅरेथॉन ची सुरवात 1985 साली याच मॅरेथॉन ने झालेली म्हणजे त्यावेळी आपल्यात मॅरेथॉन धावक होते पण 1985 पर्यंत आपल्यात मॅरेथॉन इव्हेंट होत न्हवती म्हणूनच ही मॅरेथॉन काहीही करून धवायचीच हा ठाम निर्धार केलेला.

मला एक आठवडा अगोदरच मॅरेथॉन टीमचा मेल आला(म्हणजे तो सर्वानाच येतो ज्यांनी रजिस्टर केलेलं असतं) की मॅरेथॉन च्या एक दिवस अगोदर आपण bib कलेक्शन करण्यासाठी यायचं Bib Collection हा शब्द पण माझ्यासाठी एकदम नवाच होता. मी 5 तरखेलाच पुण्याला जाऊन Bib कलेक्शन केलं(प्रत्यक्ष तिथं गेलो तेव्हा समजलं Bib Collection काय असतं Bib म्हणजे आपल्याकडून रजिस्टर करताना जी रक्कम घेतली जाते त्याबदल्यात आपणास एक T-shirt, धावताना छातीवर लावण्यासाठी डिजिटल चिप असलेला चेस्ट नंबर, आणि थोड्याफार खायच्या वस्तू वगैरे) Bib कलेक्शन करून मी डेक्कन ला सचिनकडे रहायला गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता रिपोर्टिंग टाईम होता त्यामुळे मनात हुरहुर चालू होती की कसं होईल आपलं रनिंग, वेळेवर जाग येईल की नाही अशा अनेक विचारांचे मनात काहूर चालू होते. विचार करत केव्हा झोपलो समजलंच नाही आणि अखेर मॅरेथॉन चा दिवस उजाडला मी तयार वगैरे झालो मॅरेथॉन ला पळायचं म्हणून माझा तो अडीशे रुपयांचा बुट मस्तपैकी धुवून व्यवस्थित चमकवला होता तोच बुट घातला त्यांनी दिलेला BIB नंबर टीशर्ट वर लावून तो अंगात घातला आणि मंग जिथून मॅरेथॉन चालू होणार होती तिथं सचिन मला सोडायला आला

स्टार्ट पॉईंट ला टिपलेला माझा आणि सचिनचा फोटो

माझ्याप्रमाणे सचिनला सुद्धा हा अनुभव एकदम नवाच होता रविवार असल्याने त्याला पण सुट्टीच होती त्यामुळे तो सुद्धा एन्जॉय करत होता.

तिथे आलेले धावक पाहून मी स्वतःला खुप छोटा समजू लागलो म्हणजे तिथं आलेलं सर्व धावक एकदम प्रोफेशनल होते आणि विशेष म्हणजे बाहेरच्या देशातील सुद्धा खुप रनर होते त्या सर्वांच्या हातात रनिंग ची ब्रँडेड घड्याळ होती, त्या सर्वांनी घातलेलं बुट किमान 10 हजारांहूनही जास्त किमतीचे होते  त्यांच्या बुटाकडे पाहून मी माझ्या बुटाकडे पाहिलं की मला माझीच लाज वाटायची पण पुन्हा मनाला धिर द्यायचो काही का असेना आपल्याला ही मॅरेथॉन पुर्ण करायचीच आहे आणि तिथल्या माहोल मुळे माझा आत्मविश्वास अजून वाढला सर्वकाही प्रथमच आणि नवीन असल्यामुळे आम्ही खुप फोटोग्राफी केली.

धावण्याची वेळ होत आलेली आम्ही सर्व lineup झालो (म्हणजे धावण्यासाठी सज्ज झालो) फुल मॅरेथॉन 42 किमी धावणारे आम्ही एकूण 54 धावक होतो सचिन मला लांबूनच इशाऱ्याने प्रोत्साहित करत होता. तब्बल 42किमी अंतर धावायचं होतं मानसिक घालमेल मुळ पायाचे गोळे अगोदरच वर आल्याचा भास होत होता आणि मनाची होत असलेली हुरहूर ती वेगळीच.

अखेर मॅरेथॉन चा flag off झाला आणि आम्ही धावायला सुरवात केली सुरवातीचे 25 किमी जवळजवळ मी 1k/4.5min साडेचार ते पाच च्या pace ने पळालो पण त्यानंतर मात्र रबरी बुटामुळे पायाला खालून मार लागत होता ज्यामुळे पाय जॅम व्हायला लागलेलं पण रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली शाळेची मुले, ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी असलेलं महाराष्ट्र पोलीस चे जवान खुप प्रोत्साहित करत होते आणि दुसरीकडे ललिता बाबर यांच्याहस्ते मेडल स्वीकारायची मनात असलेली आस आपोआप फिनिश लाईनकडे खेचत होती.

अखेर मी फिनिश लाईन जवळ पोहचत आलेलो पण नेमका तिथंच रस्त्याचे डायरेक्शन देणारा सपोर्टिंग स्टाफ कोणीच न्हवता आणि माझी पहिलीच मॅरेथॉन असल्यामुळे कोणाला माहीत फिनिश लाईन ला मॅट असते ती क्रॉस करावी लागते,  त्यामुळं चुकून फिनिश लाईन ला न जाता मोबाईल एप्लिकेशन मध्ये 42 किमी अंतर दाखवल्यामुळे दुसऱ्या रस्त्याने डायरेक्ट बाबुराव सनस ग्राउंड ला माझ्या मोबाईल मध्य लावलेल्या वेळेनुसार 3 तास 48 मिनिटां येऊन आयुष्यातील पहिली फुल मॅरेथॉन पूर्ण केल्याचा आनंद साजरा करत होतो. तिकडे सचिन माझी फिनिश लाईन ला स्वागतासाठी वाट पाहत उभा होता पण मी मात्र मॅरेथॉन पूर्ण झाली म्हणून नाचत होतो त्याला फोनवरून मी आत आहे ते समजले तेव्हा त्याने आत येऊन मला फिनिश लाईन ला न्हेल तोपर्यंत जवळजवळ अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला. पाय खुपच जॅम झालेलं तरीही कसाबसा जाऊन फिनिश लाईन क्रॉस केली तेव्हा लगेच मोबाईल वर मॅसेज आला Dear Rahul Jagdale You Have Successfully Finished 30th Pune International Marathon Time Is 4hrs 23min तेव्हा समजलं की आपल्याला जो छातीवर लावायला नंबर दिलेला त्याला फोल्ड न करण्याचे संकेत का दिले होते कारण त्याच्या दुसऱ्या बाजूला डिजिटल चीफ लावलेली असते जी रनिंग चे प्रॉपर अंतर आणि वेळ सांगते
Marathon Result
माझा हा वेळेचा गोंधळ केवळ रोड सपोर्ट स्टाफ उपस्थित नसल्यामुळे आणि माझी ही पहिलीच मॅरेथॉन असल्यामुळे झाला होता त्यामुळं माझ्या मोबाईल च्या वेळेत आणि मॅरेथॉन च्या ऑफिशियल वेळेत जवळजवळ 35 मिनिटांचा फरक झालेला तरीपण दुसरीकडे आपण पहिलीच मॅरेथॉन पुर्ण केली याचा आनंद खुप झालेला.  हा क्षण माझ्यासाठी खुप अविस्मरणीय आणि मौल्यवान होता कारण त्यादिवशी माझ्या गळ्यात पहिलंच फुल मॅरेथॉन च मेडल आणि हातात फिनिशर सर्टिफिकेट होतं.
मॅरेथॉन चा कसलाही अनुभव नसताना यशस्वीपणे पुर्ण केलेली माझी ही पहिलीच फुल मॅरेथॉन
कोणतीही फुल मॅरेथॉन धावण्यासाठी धावक 6 महिने अगोदर पासुन सराव करत असतात 5 किमी पासुन 30 किमी पर्यंत प्रॅक्टिस रन करतात पण माझ्याकडे आमच्या फौज मधील सकाळच नॉर्मल रन आणि X-Country चे रनिंग सोडलं तर  मॅरेथॉन बद्दलचा कोणताही अनुभव नसताना डायरेक्ट 42 किमी ची फुल मॅरेथॉन धावुन वयाच्या 29 व्या वर्षी मॅरेथॉनर ही डिग्री प्राप्त केलेली.
 
इकडे तोपर्यंत माझे दुसरे मित्र सुहास महामुनी यांनी गावातील गृपवर माझ्या मॅरेथॉन बद्दल टाकुन दिलेले माझ्या घरच्यांनाही तेव्हाच समजलं मी 42 किमी अंतर धावलो हे ऐकून आई तर अक्षरशः फोनवरच रडु लागली कसा एवढा धावलास पाय दुखतायत का तुझे असं अनेक प्रश्न काळजीपोटी विचारू लागली.  बाकी सर्वांचे फोन पण यायला लागलं, सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला एवढं सगळं असूनही मला एक उणीव भासत होती ती म्हणजे ज्यांना भेटण्यासाठी ही मॅरेथॉन धावलेलो त्या म्हणजे ललिता ताई 2016 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक च्या तयारीमुळे तिथं येऊ शकल्या न्हवत्या. नंतर केव्हातरी नक्कीच भेट होईल असा मनाला धीर दिला आणि पुन्हा आनंद साजरा करू लागलो.

आपण आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टीही शक्य करू शकतो हे तेव्हा समजलं. दुसऱ्याच्या यशाचा तिरस्कार न करता त्याच्यातून स्वतःसाठी काहीतरी प्रेरणा घेऊन आपला नवीन इतिहास घडवायचा असतो याची प्रत्यक्ष प्रचीती तेव्हा आली.

तिथंच माझ्या मॅरेथॉन प्रवासाची पायाभरणी झाली आणि माझ्या अंतर्मनाने मला तिथंच जाणीव करून दिली की आपलं ध्येय वेगळंच काहीतरी आहे. या मॅरेथॉन मुळे मला एक वेगळी ओळख मिळाली. मी जेव्हा आमच्या गावात पोहचलो तेव्हा आमच्या गावातील डॉक्टर तिवाटणे यांनी मला मॅरेथॉन मध्ये मिळालेल्या मेडल सहित हायस्कूल शाळेत मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करण्यासाठी बोलावलं खरं तर तेव्हा मिळालेल्या या सन्मानामुळे खुपच भावुक झालेलो शाळेतील मुलांना संबोधित करून आपल्या गावातसुद्धा एक दिवस धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्याचे आश्वासन देऊन आलो आणि 2 महिन्यातच ते आश्वासन सत्यात उतरवलं आमच्या पंचक्रोशीचे हुतात्मा दत्तात्रेय सत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त 5 किमी आणि 3 किमी च्या स्पर्धा ठेवल्या आणि गावातील सर्व तरुण आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या यशस्वीपणे पारही पडल्या. तेव्हापासून जिथं जिथं धावण्याच्या स्पर्धा, मॅरेथॉन होऊ लागल्या तिथं तिथं मी हळूहळू हजेरी लावू लागलो 

माझं पोस्टींग अरुणाचल प्रदेश मध्येच होतं तिथल्या डोंगराळ रस्त्यात मी कधी 5 कधी 10 किमी चा सराव करू लागलो तिथं होणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी होऊ लागलो परंतु मॅरेथॉन साठीच जे प्रॉपर प्रशिक्षण असतं त्याच्यापासून दुरच होतो हे 2019 पर्यंत तसेच चालु राहील. अचानक एकदिवस आमच्याच तालुक्यातील माणदेश मॅरेथॉन ची Announcement झाली त्यानुसार त्यासाठी रजिस्ट्रेशन केलं माझ्याबरोबर माझे परममित्र विशाल सूर्यवंशी सुद्धा होते आपल्याच तालुक्यातील मॅरेथॉन असल्याने एक वेगळाच हुरूप होता मॅरेथॉन च्या दिवशी सकाळी साडेचार वाजता आम्हा दोघांना मॅरेथॉन च्या स्टार्ट पॉईंट ला आमचे परम मित्र विकास खरात यांनी सोडलं.
स्टार्ट पॉइंटवर मी, विशाल सर आणि विकास सर
ठरलेल्या वेळेत मॅरेथॉन सुरु झाली माझी ती हाफ मॅरेथॉन 1 तास 49 मिनिटांत पूर्ण झाली ती हाफ मॅरेथॉन गोंदवले ते वडुज दरम्यान होती आपल्या गावची मॅरेथॉन धावण्याची वेगळीच मौज असते हे तेव्हा मी अनुभवल त्याच हाफ मॅरेथॉन मध्ये आमच्या गावातील पत्रकार रुपेश कदम यांनी ललिता ताईंची भेट घडवून दिली
हाच तो माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर यांच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण


हाफ मॅरेथॉन पुर्ण केल्यानंतर मी आणि परममित्र विशाल सूर्यवंशी

विशेष म्हणजे याच हाफ मॅरेथॉन मध्ये स्वतःच एक वेगळंच विश्व असलेलं व्यक्तिमत्त्व धावण्याच्या विश्वातील बादशहा आयुष्य सुंदर आहे मज्जाच मज्जा मानणारे फक्त 49 वर्षाचे तरुण माणरत्न श्री नामदेव भोसले यांचीही भेट झाली आणि त्यांना भेटल्यानंतरच मला माझ्या धावण्याची लेवल समजली. त्यांच्यासोबतच्या प्रवासाबद्दल बरेच काही आहे लिहायला ते पुढच्या ब्लॉग मध्ये लिहील.

माणदेश मॅरेथॉन झाली आणि योगायोगाने माझं पोस्टिंग मुंबई मध्येच झालं म्हणजे माझ्या नकळतपणे नियतीच मला माझ्या ध्येयाकडे खेचून आणत होती हे मलाच समजत न्हवतं. माणदेश मॅरेथॉन नंतर लगेच दोन महिन्यातच फेब्रुवारी 2020 मध्ये महाराष्ट्र पोलिस ची हाफ मॅरेथॉन होती त्यालाही रजिस्टर केलं जे 1 तास 46 मिनिटांत पुर्ण केलं. केवळ दीड महिन्यातच 3 मिनिटे टाईम कव्हर केलेलं यामुळे आत्मविश्वासाला अजून बळ मिळाले. त्याचवेळी जपान मध्ये असणारा माण चा सुपुत्र दादा सूर्यवंशी ने माणदेश रनर्स गृप मध्ये शामिल करून घेतलं. ज्यामुळे माण तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात असणाऱ्या आणि धावण्याचा छंद जोपासणाऱ्या दिग्गजांची ओळख झाली हळूहळू मुंबईच्या रस्त्यावर पाय थिरकु लागले गाडीने जिथं जाऊ शकलो न्हवतो तिथं धावत ये जा करू लागलो. 

  त्याचवेळी अचानक आलेल्या कोविड च्या संकटामुळे 23 एप्रिल 2020 ला संपूर्ण लॉकडाऊन झालं आणि सगळंच थांबलं पण थांबतील ते धावक कसले, कॅम्पस च्या आतमध्ये 400 मीटर चा ट्रॅक होता त्याच ट्रॅकवर धावायला सुरवात केली आणि ती सुरवात अशा स्टेपवर जाऊन पोहचली की त्याच 400 मीटर च्या ट्रॅकवर 21 किमी केव्हा पळून व्हायचं समजायचंच नाही याचा सगळ्यात जास्त फायदा स्वतःच्या Immunity Power वरती झाला म्हणजे नकळतपणे शरीर एवढं सुदृढ झालं की कोविड पेशंटच्या सानिध्यात राहून सुद्धा कधीही कसलाच त्रास जाणवला नाही. कोरोना काळातच अनेक Virtual Marathon, Half Marathon, 10किमी रन 5किमी रन करून स्वतःचेच पर्सनल बेस्ट बनवलं आणि याचे मुख्य गुरू होते मंत्रालयात असलेले रनिंग चे बादशाह डॉ. नामदेव भोसले सर त्यांच्यामुळेच रनिंग माझ्या नसानसात भिनल गेलं.

 अखेर एक दिवस लॉकडाऊन संपलं आणि हळूहळू सर्व सुरळीत होऊ लागलं धावक पुन्हा नव्या जोमाने रस्त्यावर धावू लागलं मी सुध्दा बाहेर धावायला जाऊ लागलो.

 लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर पहिल्यांदाच सहज नामदेव सरांच्या सोबत प्रॅक्टिस रन साठी मरिन ड्राईव्ह ला गेलो.
गिरगाव चौपाटीवर नामदेव सरांसोबत धावण्याचा आनंद लुटताना
 धावत धावत वेगवेगळ्या गप्पा रंगल्या नुकतंच वाचण्यात आलेल्या आफ्रिकेतील 90 किमी अंतराच्या कॉम्रेड मॅरेथॉन बद्दल विचारलं आणि काय योगायोग चक्क ती 90 किमी ची अल्ट्रा मॅरेथॉन सरांनी 2019 सालीच यशस्वीरीत्या पूर्ण केलेली आणि आमच्या माण तालुक्यातील ते पहिले कॉम्रेड धावक होते मंग काय तेव्हा तिथंच धावत धावत सरांना बोललो मी सुद्धा ती मॅरेथॉन धावणार. अरे तु तर खुप आरामात करशील असं बोलून त्यांनी माझा उत्साह अजून वाढवला कॉम्रेडचे सर्व अनुभव सरांनी मला त्यावेळी सांगितले आणि कॉम्रेड पुर्ण करण्यासाठी काय काय प्रशिक्षण घ्यावं लागेल हे सुद्धा सांगितले त्यासाठी त्यांनी मला जागतिक दर्जाचे प्रशिक्षक सतिश गुजारन सर यांना भेटण्याचा सल्ला दिला त्याअगोदर त्यांनी माझी सर्व माहिती सतिश सरांना सांगितली होती सतिश सर भारतातील एकमेव असे धावक आहेत 2019 पर्यंत त्यांनी 90 किमी ची कॉम्रेड मॅरेथॉन सलग 10 वेळापुर्ण केलेली आणि त्यांना आफ्रिका कॉम्रेड असोसिएशनने Green Bib Number देऊन सन्मानित केलेलं आणि त्यांच्याकडे मी प्रशिक्षण घेणार हे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद होतं.

 ठरल्याप्रमाणे मी सतिश सरांना फोन केला आणि त्यांना प्रत्यक्ष भेटायला गेलो.
दिनांक 29 जानेवारी 2021 रोजीची माझी आणि सतिश सरांची अविस्मरणीय पहिली भेट

आणि इथूनच सुरू झाला माझा साऊथ आफ्रिकेतील 90 किमी च्या कॉम्रेड मॅरेथॉन चा खडतर तितकाच मज्जेशीर प्रवास जो आपणाला सविस्तरपणे नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे🙏
                धन्यवाद🙏

                                          क्रमशः.............

Comments

  1. अप्रतिम लिहलंयस दादा,म्हणजे तुझ्या मॅरेथॉनच्या प्रवासाची एकेक ओळ वाचताना अंगावर काटा उभा राहत होता आणि त्याहुनही जास्त मनात तुझ्याबद्दल अभिमान वाटत होता.२५० रुपयांच्या बुटांनी धावायला केलेली सुरवात खरंच कौतुकास्पद आहे.खुप खुप मोठा हो.आणि अजून लिह तुझा पुर्ण प्रवास वाचायचा आहे
    पणे ्

    REPLY

Post a Comment

Comments