पोपट अर्थात पोपट्या भाग 1
*चित्रपट : पोपट अर्थात पोपट्या*
माझे टोपण नाव. आजही माझे बालपणी चे मित्र मला भेटले की पोपट म्हणूनच हाक मारतात.
एका लहानशा खेड्यात जन्माला आलेल बाळ. लहानपणा पासूनच थोडस खोडकर खट्याळ. वयाची 3 वर्षे पूर्ण होईपर्यंत नीट बोलता येत नव्हत असे आई सांगायची. नंतर बोलायला लागला तर काय बोलतोय कोणास काही कळत नव्हत. आई वडिल मुंबईला असलेने न कळणार बालपण मुंबईतच माझगाव ला नारळ वाडीत गेल. वडिल पैलवान होते. मफतलाल मिल मध्ये नोकरीस होते व बोरगावकरांच्या तालमीत कुस्ती खेळायचे त्यामूळे त्याना नारळवाडीतील सर्व सुभेदार पैलवान म्हणूनच ओळखायचे.
तेव्हाचा एक प्रसंग रव्याची पिशवी जिन्यात पडली व रवा सांडला म्हणून वडिल मारतील या भितीने 3 तास शेजारील घरातील खाटेखाली दडुन बसलो होतो. त्या वेळात वडीलानी शिव्यंची लाखोली वाहत व चाळीतील सर्व मंडळींनी आखी नारळ वाडी पालथी घातली होती.
दुसरा प्रसंग असा, चाळीतील तिसर्या माळ्यावर खोलीसमोर असलेल्या लोखंडी बार मधून संपूर्ण शरीर व डोक बाहेर काढून खाली बघत बारला पकडून मस्त हसत होतो. सर्वांच्या र्हदयाचा ठोका चुकला होता. सर्व चाळकरी मंडळी चिडीचूप व अचंबित होऊन आता याचे कसे होणार याच भितीने स्तब्ध व चुपचाप ऊभी होती. शेजारील ढोकळवाडीच्या सुमन मामीने हिम्मत करुन मागून हळूच येऊन मला अलगद उचलले होते. व माझे प्राण वाचवले होते. जेव्हा जेव्हा त्या मामी भेटायच्या तेव्हा तेव्हा त्या हा लहान पणीचा किस्सा बोलुन दाखवायच्या.
वडिलांच्या पोटातील आजारपणा मुळे मुंबई सुटली व आमचे कुटुंब गावी गेले. इयत्ता 1ली त प्रवेश घेतला व आयुष्याचा नविन प्रवास सुरु झाला. एकत्र कुटुंब होते. आजी आजोबा आबा मावशी व भागुबाई (आई वडील देवाघरी गेल्याने आजोबानी सांभाळ करणेसाठी घेतलेली जबाबदारी). त्यात आमच्या तिघांची भर पडली. वडिल शेती करायला लागले व काका म्हणजे आमचे आबा मुम्बईला आले. शालेय शिक्षण 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत व नंतर 10वी पर्यंत रयत शिक्षण संस्थेत झाले. रोज शाळेत जायच पण शाळेतून घरी आल्यावर 1किमी दूर असलेल्या शेतात न चुकता जायचे हे ठरलेल होत. नाहीतर संध्याकाळी बाबांचे म्हणजे बापुंचे सटासट फटके मिळायचे . ते फटके एवढे भारी असायचे की अंगावर वळ उठायचे. त्यामुळे कधी शेत चुकवायची हिम्मत झाली नाही. बापुंना फक्त शेती व मुलांने शिकल पाहिजे. एवढच माहीत होत. कधी चुकून बाहेर दिसले की ते घरी पोहोचायच्या आत घरी पोहोचायचो. शाळेत असेपर्यंत माझे बाबा मला एक रागीट तापट खडूस व माझ्यावर प्रेम न करणारा बाप वाटायचे. त्यामूळे त्यांच्या समोर काही बोलणे कधी जमलेच नाही. परंतु त्यांच ते वागण मला आता शिस्त वाटते.
अशा परिस्थितत माझ्या शालेय जीवनाच्या काळात मला खरा आधार व आदर्श होती ती माझी आई. खूप हुशार, देखणी, साधी, सरळमार्गी. संपूर्ण घराची जबाबदारी तिने खूप समर्थपणे पेलली होती. आजोबा गावचे बडे प्रस्थ होते. स्वातंत्र्यानंतर 10वर्षे गावचे सरपंच होते. त्यामुळे आमच्या घरी कायम आजूबाजूच्या परिसरातील गावकरर्यंचा भांडण तंटा सोडवण्यासाठी राबता असायचा. सकाळी गावातील ईतर समाजातील बरीच बलुतेदार मंडळी घरी यायची. त्या सर्वाना चहा पाणी, जेवणाची व्यवस्था करायची जबाबदारी आई समर्थपणे पार पाडी तेही आपली 5 मुले सांभाळून. आम्ही सर्व चार भाऊ व एक बहिण. शेवटची भाऊ बहिण जोडी ही जुळी भावंड. ही सर्व भावंड 10 वर्षाच्या फरकातली त्यामुळे घरात नुसता किलकिलाट. लय मज्जा यायची. कोण रडतय, कोण खायला मागतय, कोण झोपायचा हट्ट करतय. आईची तारेवरची कसरत असायची. खूप कष्ट उपसले माऊलीने व आम्हा पाच ही भावंडांना उत्तम शालेय शिक्षण दिले. चांगले संस्कार दिले. खूप काही शिकवल तेच आजही आम्ही सर्व आचरणात आणत आहोत.
शाळेत थोड हुशार अशी ख्याती असल्याने मी व माझे आणखी 4 हुशार वर्गमित्र (अरुण, मारुती, सुभाष व बाळू) याना ईयता 10वी ला गेल्यावर आमच्या गावातील एक शेठ रमणभाई गुजर यानी त्यांचा स्वतचा नविन बंगला अभ्यास करणेस दिला होता. खूप अभ्यास केला फ़र्स्ट क्लास मध्ये आलो पण मार्क्स जेमतेमच पडले. मनासारखे नाही घडले. अपेक्षाभंग झाला व त्या बाल वयात एक आयुष्याचा धडा मिळाला. व तो धडा घेऊनच कॉलेज साठी गाव सोडले ते आजतागायत. गावातून कॉलेज साठी बाहेर पडलेला तो पोपट कधी अरविंद झाला व गावास दुरावला हे समजलच नाही.
अरविंद काटकर
यूनिवर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन.
मुंबई.
Comments
Post a Comment